गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

कपिल / दोन

तर असा हा कपिल म्हणजे भाचा – म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा! गोरा,गोरापान. तरतरीत. टपोरे डोळे. वेधक चेहरा. संपूर्ण नाव कपिल धुंडीराज कुलकर्णी. वय वर्षे आठ. इयत्ता तिसरी. हुषार. लाघवी. जिज्ञासू. विचक्षण. वगैरे. वगैरे.
कपिलला गाण्याची मनस्वी आवड आहे. सुरुसुरुवातीला तो हिंदी सिनेमातील उडत्या आणि भडक चालीतील गाणी आपली पिटुकली कंबर हलवीत तल्लीन होऊन म्हणत असे. पण जेव्हा तो जिल्ह्याचे गाव सोडून माझ्याकडे राहायला आला- म्हणजे मीच त्याला माझ्या गावाकडे घेऊन आलो-तेव्हापासून त्याची ‘टेस्ट’ बदलली. कदाचित माझ्या धाकामुळे असेल, कदाचित हिच्या, अथवा दोघांच्याही... पण आता त्याला मराठी भावगीते, भक्तिगीते, बालगीते, आवडू लागली आहेत. म्हणतोही छान. म्हणजे ‘षडज’ न सोडता. सुरात. लयीत. तालात. आणि हा ताल तो कधी अँल्युमिनियमच्या डब्यावर, डब्याच्या झाकणावर धरतो तर कधी आपल्या गुडघ्यांवर धरतो...आवाज खणखणीत. उच्चार स्पष्ट. स्वच्छ.
पंचांग आणि ‘वैद्या’ प्रमाणे हार्मोनियमही घरचाच....पण तरीही आमच्या गाणे म्हणण्याच्या व त्याला गाणे शिकविण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तासभर. आणि सुटीच्या दिवशी तर जवळजवळ दिवसभरच... परंतु लहर लागली, की तो माझ्या माडीवरच्या खोलीत येतो, आणि आपल्याच तंद्रीत गाणे सुरू करतो.
मी कामात असेन तर त्याला रागावून चूप करतो. माझा मूड असेल तर क्वचित माझ्यातला ‘केशवकुमार’ जागा होतो....
एकदा रात्रीच्या वेळी आमची मैफिल रंगली होती. मधल्या वाडयातले सुरेशराव पंतांची भजने म्हणत होते. त्यांच्या शेजारीच मांडी घालून बसलेला कपिल देहाचा कान आणि मांडीचा तबला करून ऎकत होता....
सुरेशरावांनी मध्यंतर घेतला आणि तेवढयात कपिलने त्यांना ‘आपली आवड’ बोलून दाखवली. माझ्याकडे मान वर करून बघत म्हणाला, ‘ मामा, ते हे गाणे म्हणायला सांग की रे सुरेशमामांना...’
‘कोणते?’ पेटी थांबवून मी प्रश्न केला.
‘ ते, हे रे-’
त्याला ते नेमके गाणे सांगता येईना. ‘अं...’ असे करीत, डोळे बारीक करून तो गाण्याचे शब्द आठवू लागला....
मग मी त्याला, त्याला येत असलेली, माहीत असलेली, आवडत असलेली काही गाणी विचारली. पण प्रत्येक गाण्याला त्याने ‘ते नव्हे रे-’, ‘अंह-’ अशी उत्तरे दिली...
आम्ही सगळे विचार करू लागलो. परंतु त्याला नेमके कोणते गाणे अभिप्रेत होते, ते काही समजेना. मी त्याला विचारले, ‘ शब्द कोणते आहेत, ते तरी सांग बघू त्या गाण्यातले?’
‘ते हे रे-’ चेहरा गंभीर करून तो सांगू लागला, ‘ आरशावरती रावण उडला-’
‘आरशावरती रावण उडला’ असे त्याने म्हटल्याबरोबर मी, ही, सुरेशराव, पलीकडच्या घरातला विजू, मेधा - आम्ही सर्वजन खळ्ळ्कन हंसू लागलो...
आमचे ते हसणे त्याला आपला अपमान वाटला. तो चिडला. रागाला आला. रागाने चेहरा-डोळे चित्रचिचित्र करू लागला....
-शेवटी खूप मंथन केल्यानंतर समजले ते हे, की त्याला हवे असलेले गाणे ‘भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी’ हे होते आणि ‘अर्ध्यावरती डाव मोडिला’ चे त्याने ‘आरशावरती रावण उडला’ असे केले होते!
‘माझे माहेर पंढरी’ हा कपिलचा परमप्रिय अभंग. ‘पंढरी-’ असा त्याने तार षडजावर अभंग संपवला, आणि तेव्हा जर ‘ही’ समोर असेल ्तर मला तिची चेष्टा करण्याची लहर येते... मग मी माझा अभंग सुरू करतो. तो लगेच मांडी घालून, मानेला हिसके देत ताल धरू लागतो.अभंगाची पहिली ओळ उत्स्फूर्त येते.मग मात्र धर एक चरणाला पाच-एक सेकंद विचार करून माझा अभंग तयार होतो. अभंग तयार होतो म्हणजे फक्त यमकांची खटपट-शब्दांव्ही जुळवाजुळव! ...तबला वजवता वाजवता तोही रंगून जातो, अभंग गाता गाता मीही तल्लीन होऊन जातो!-
‘माझे माहेर कोल्हापूरी । आहे पंचगंगा तीरी॥१॥
माझी बहीण विजूताई। तिची सदा गदबड घाई॥२॥
बंडोपंत आहे बंधू । त्याची छाती काय सांगू॥३।
जनता जनार्दनी शरण । करी आहेरची आठवण॥४॥’
अभंग संपतो. कपिलला तो फार आवडतो. कारण त्यात त्याच्या मामीची चेष्टा असते ना!टाळ्या पिटून, ‘हो-’ असा आवाज काढून, मामीकडे पाहत तो आपला आनंद व्यक्त करतो. मला पुन्ह:पुन्हा तोच अभंग म्हणायचा आग्रह करतो. मीही त्याचा आग्रह मान्य करतो.‘मलाही हा अभंग शिकव की रे मामा’ म्हणतो.मग मी त्याला अभंग शिकवू लागतो...त्याची मामी माझ्याकडे पाहत डोळे वटारते. पण मी तिकडे लक्ष न दिल्यासारखे करतो. मग तो माझा अभंग जोराने म्हणू लागतो...त्याची मामी त्याला रागे भरू लागते. हलकीशी एक चापट-पोळीही देते...तो हिरसमुसला होतो. कधीकधी रडतोही. माझ्याकडे रागाने पाहत कोप~यात उभा राहतो. तूच मामीकडून मला मार खायला लावलास, ही त्याच्या नजरेतली जळजळीत भावना!मी दुष्ट. मनातल्या मनात हसत राहतो. माझ्यावर रागावलेल्या कपिलला पाहून, त्याच्यावर रागावलेल्या त्याच्या मामीलाही पाहून...
पण अभ्र पांगून प्रकाश बरसायला फार वेळ लागत नाही.‘आता तुला एक मस्तपैकी कथा सांगतो हं, सांगू की नको?’असं विचारलं की झालं!!
अलीकडे ही मोडक्य-तोडक्या कविता करू लागली आहे. कसे काय कुणास ठाऊक-पण मीही तशाच कविता करू लागलो आहे. कविता म्हणजे तशा कविता नव्हेत, उगीच आपले ट’ ला ‘ट’ आणि ‘री’ ला ‘र्री’ जुळवायचे. आपली एक गंमत म्हणून आणि तेही लहर लागई तर!परंतु याचा परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हा उभयतांचे व्यावहारिक संभाशणही प्रास-यमक-वृत्तबद्ध होत आहे. म्हणजे असे:
सर्व वारांमध्ये मला रविवारच अधिक आवडतो.कारण त्यादिवशी सखाळी खूप उशिरापर्यंत झोपायला मिळते. प्रत्यक्ष प्रेम करायला फार कमी मिळते, हा भाग वेगळा, पण माझे सर्वात जास्त प्रेमा कुणावर असेल तर तर ते झोपेवरच! रविवारी किंवा सुटीच्या दिवशी खूप खूप झोपायला मिळावे म्हणून मी आदल्या रात्री अर्धा-पाऊण पिंट राँकेल जाळतो. परंतु अजून तरी रविवारसकट सगळ्या सुटयांची स्थिती ना.सी.फडक्यांच्या ‘रविवार’ सारखीच झालेली आहे.पुढचा जन्म जर असेल, व तो जर मिळाला, आणि तशी ‘अनुकूल’ परिस्थिती सुदैवाने लाभलीच, तर उभे आयुष्यझोपून काढण्यचा माझा मानस आहे...
तर काय सांगत होतो मी? हां-सुटीच्या दिवशी मला उठायला किंचित उशीर होतो आहे, असे हिला वाटायला लागले, की माडीवर येते, आणि माझ्या तोंडावरची चादर हलक्या हाताने काढत म्हणते-
‘उठा, उठा हो मालक।
आला अंगणीं रविबालक।
भिंतीवरचे वाँलक्लाँक।
(‘भिंती्वरचे वाँलक्लाँ’ हं!)
काय कथिते परिसा तरी॥’
तिकडे रेडियोवर ‘मालवून टाक दीप’ लागले, की तो दीप मालवायच्या आत इकडेओळी तयार असत-
‘मालवून टाक लाईट,आँफ करून स्विच स्विच।
राजसा किती दिसात, जाहला तुला न लेट’
तिकडे ‘का हासला किनारा, पाहून धुंद लाट’ संपले की माझे इकडे तयार असते.‘पाहुनिया विहिरीला, का हासला रहाट’
या सा~याचा कपिलच्या टाळक्यावर एक वाईट्ट परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हाला हवे असलेले शब्द, यमक वगैरे आपल्या बालबुद्धीप्रमाणे तो आम्हाला पुरवू लागला आहे. ...
एकदा असेच झाले. सुटीच्या दिवशी मी माडीवर काहीतरी लिहीत बसलो होतो. दुपारचा एकचा सुमार असावा. स्वयंपाक करून ठेवून ही मला वरंवार ‘उठताय ना जेवायला?’, ‘येताय ना जेवायला?’ असे खालून विचारीत होती. मीही मान वर न करता तिच्या प्रत्येक प्रश्नाला ‘झालेच’, ‘आओच’ असे उत्तर देत होतो. पण माझे ते ‘झालेच-’ काही लवकर होत नव्हते, आणि ती दर सेकंदाला चिडत होती.....
काही वेळाने टपालवाल्याने तिचे नाव पुकारून पत्र टाकले. ती आनंदली. कारण पत्र माहेरचे होते. माडीच्या पाय~या चढत, ‘ओवी’ टोन मध्ये शब्द गुंफत ती म्हणाली-
‘उठा, उठा हो साहेब।’
पण गाडीचे चाक रुतले.पुढची ओळ काय टाकायची, ते तिला सुचेना. मात्र तिच्या पदराचे टोक धरून तिच्या मागून येणा~या कपिलने आपल्या बालबुद्धीने तिची अडलेली गाडी पुढे ढकलली. म्हणाला-
‘उठा, उठा हो साहेब। करा जोंधळ्याचा हिशोब॥’
जेव्हा तो राहायला म्हणून माझ्याकडे प्रथमच आला तेव्हा माझ्या काँलेजची मे महिन्याची सुटी अजून संपायची होती. त्यामुळे त्यची शाळा सुटल्यानंतर मी त्याला रोज संध्याकाळी फिरायला म्हणून माळावर नेत असे. मधल्या वाटेने-हिरवे , पिवळे पीक खेळविणा~या शेताच्या बांधावरील पायवाटेवरून!!
पहिल्याच दिवशी त्याने मला हे झाड कशाचे, ते झाड कशाचे, या फुलाचे नाव काय, त्या फुलाचे नाव काय, या पानाचा असाच का र्रं, त्या पानाचा तसाच का रंग, या शेताचे मालक कोण आहेत, तुझे शेत आहे की नाही- असे हज्जार प्रश्न करून हैराण हैरण करून सोडले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा