गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

कपिल / एक

सकाळी नऊ-दहाच्या सुमारास बिच्चू गल्लीतून एखादी मिरवणूक जात असताना त्या मिरवणुकीपुढे वाजणा~या बँडच्या तालावर, अंगाला नखशिखांत साबण फासलेल्या व घरापुढच्या पायरीवर तन्मयतेने नाचणा~या नागडया छोट्या मुलाने कधीकाळी तुमचे डोळे खेचून घेतल्याचे जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही खुशाल समजा- तो मुलगा म्हणजे कपिलच!!
काही काही माणसे जन्माला येताना आपल्या तोंदातून चांदीचे चमचे वगैरे वगैरे अशा कितीतरी वस्तू घेऊन येतात! परंतु अगदी लहानपणापासूनचे कपिलचे बँद-प्रेम पाहिले, की माझ्या मनात विचार येतो- क्लँरोनेट वाजवीतच त्याने या जगात ‘एंट्री’ घेतली असावी!... कारण बँडचा आवाज कानावर पडला रे पडला, की अजूनही त्याची, आईचा आवाज ऎकताच हलक्या झोपेतून हडबडून उठणा~या व कान ताठ करून इवल्या इवल्या डोळ्यांनी काव~याबाव~या नजरेने टुकूटुकू पाहणा~या मांजरीच्या पिलासारखी स्थिती होते. भातुकलीच्या बाहुला-बाहुलीच्या लग्न-खेळातील त्याची ‘बँड’ वाल्याची त्याची ‘सीट’ सतत रीझर्व असते ती त्यामुळेच! आणि एखाधा इच्छुक बँडवाला लाच तर तो त्याला सुनावतो, ‘ बँड वाजवायचा म्हणजे ते काही सोपं नाही बाबा! होय की नाही हो?’ शेवटचा प्रश्न अर्थातच तेथे जे कोणी मोठे माणूस असेल, त्याला उद्देशून असतो
एकदा एक ‘पाहुणा’ बँडवाला अनपेक्षितपणे लग्नमंडपात दाखल झाला होता. त्यावेळी कपिलची आणि त्या नव्या बँडवाल्याची अशी काही जुगुलबंदी रंगली होती, की हां-हां म्हणता लग्नमंडपाचे युद्धभूमीत रूपांतर झाले होते!
लग्न, लग्नातील नवरा-नवरी, लग्नघरातला फराळ, नवे कपडे, पक्वान्ने, विजेची रोषणाई या सर्वांपेक्षा त्याला कशात अधिक ‘इंटरेस्ट’ वाटत असेल तर लग्नात वाजवायला आलेल्या ‘बाँड-मंडळीं’ मध्ये!!... नाहीतर एकेक मुले अशा समारंभात कशी खा-खा-खात असतात कधी न मिळाल्यासारखी! पण या बाबाचे निराळेच! लग्नाला आलेली त्याच्या वयाची मुले तिकडे खात असतात, नाचत असतात, दंगा करीत असतात आणि हा मात्र तिकडे दूर कोप~यात अंथरलेल्या जाजमावर चिवडालाडू खात बसलेल्या बँडवाल्यांचे, त्यांच्या वाद्द्यांचे, त्यांच्या अंगावरील लालभडक पोषाखाचे निरीक्षण करण्यात हरवलेला!
कपिलच्या या बँडप्रेमाचा त्याच्या आईला एक फार मोठा फायदा होतो इतर मुलांच्या आयांची अशा समारंभातील गर्दीमध्ये आपली मुले शोधताना जशी दमछाक होते तशी कपिलच्या आईची होत नाही. याचा अर्थ तो कधीच हरवत नाही, असा नव्हे, तर अशा समारंभात तो जरी चुकला-हरवला तरी न चुकता हरवलेल्या ठिकाणी अचूक सापडतो!

कपिल / दोन

तर असा हा कपिल म्हणजे भाचा – म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा! गोरा,गोरापान. तरतरीत. टपोरे डोळे. वेधक चेहरा. संपूर्ण नाव कपिल धुंडीराज कुलकर्णी. वय वर्षे आठ. इयत्ता तिसरी. हुषार. लाघवी. जिज्ञासू. विचक्षण. वगैरे. वगैरे.
कपिलला गाण्याची मनस्वी आवड आहे. सुरुसुरुवातीला तो हिंदी सिनेमातील उडत्या आणि भडक चालीतील गाणी आपली पिटुकली कंबर हलवीत तल्लीन होऊन म्हणत असे. पण जेव्हा तो जिल्ह्याचे गाव सोडून माझ्याकडे राहायला आला- म्हणजे मीच त्याला माझ्या गावाकडे घेऊन आलो-तेव्हापासून त्याची ‘टेस्ट’ बदलली. कदाचित माझ्या धाकामुळे असेल, कदाचित हिच्या, अथवा दोघांच्याही... पण आता त्याला मराठी भावगीते, भक्तिगीते, बालगीते, आवडू लागली आहेत. म्हणतोही छान. म्हणजे ‘षडज’ न सोडता. सुरात. लयीत. तालात. आणि हा ताल तो कधी अँल्युमिनियमच्या डब्यावर, डब्याच्या झाकणावर धरतो तर कधी आपल्या गुडघ्यांवर धरतो...आवाज खणखणीत. उच्चार स्पष्ट. स्वच्छ.
पंचांग आणि ‘वैद्या’ प्रमाणे हार्मोनियमही घरचाच....पण तरीही आमच्या गाणे म्हणण्याच्या व त्याला गाणे शिकविण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तासभर. आणि सुटीच्या दिवशी तर जवळजवळ दिवसभरच... परंतु लहर लागली, की तो माझ्या माडीवरच्या खोलीत येतो, आणि आपल्याच तंद्रीत गाणे सुरू करतो.
मी कामात असेन तर त्याला रागावून चूप करतो. माझा मूड असेल तर क्वचित माझ्यातला ‘केशवकुमार’ जागा होतो....
एकदा रात्रीच्या वेळी आमची मैफिल रंगली होती. मधल्या वाडयातले सुरेशराव पंतांची भजने म्हणत होते. त्यांच्या शेजारीच मांडी घालून बसलेला कपिल देहाचा कान आणि मांडीचा तबला करून ऎकत होता....
सुरेशरावांनी मध्यंतर घेतला आणि तेवढयात कपिलने त्यांना ‘आपली आवड’ बोलून दाखवली. माझ्याकडे मान वर करून बघत म्हणाला, ‘ मामा, ते हे गाणे म्हणायला सांग की रे सुरेशमामांना...’
‘कोणते?’ पेटी थांबवून मी प्रश्न केला.
‘ ते, हे रे-’
त्याला ते नेमके गाणे सांगता येईना. ‘अं...’ असे करीत, डोळे बारीक करून तो गाण्याचे शब्द आठवू लागला....
मग मी त्याला, त्याला येत असलेली, माहीत असलेली, आवडत असलेली काही गाणी विचारली. पण प्रत्येक गाण्याला त्याने ‘ते नव्हे रे-’, ‘अंह-’ अशी उत्तरे दिली...
आम्ही सगळे विचार करू लागलो. परंतु त्याला नेमके कोणते गाणे अभिप्रेत होते, ते काही समजेना. मी त्याला विचारले, ‘ शब्द कोणते आहेत, ते तरी सांग बघू त्या गाण्यातले?’
‘ते हे रे-’ चेहरा गंभीर करून तो सांगू लागला, ‘ आरशावरती रावण उडला-’
‘आरशावरती रावण उडला’ असे त्याने म्हटल्याबरोबर मी, ही, सुरेशराव, पलीकडच्या घरातला विजू, मेधा - आम्ही सर्वजन खळ्ळ्कन हंसू लागलो...
आमचे ते हसणे त्याला आपला अपमान वाटला. तो चिडला. रागाला आला. रागाने चेहरा-डोळे चित्रचिचित्र करू लागला....
-शेवटी खूप मंथन केल्यानंतर समजले ते हे, की त्याला हवे असलेले गाणे ‘भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी’ हे होते आणि ‘अर्ध्यावरती डाव मोडिला’ चे त्याने ‘आरशावरती रावण उडला’ असे केले होते!
‘माझे माहेर पंढरी’ हा कपिलचा परमप्रिय अभंग. ‘पंढरी-’ असा त्याने तार षडजावर अभंग संपवला, आणि तेव्हा जर ‘ही’ समोर असेल ्तर मला तिची चेष्टा करण्याची लहर येते... मग मी माझा अभंग सुरू करतो. तो लगेच मांडी घालून, मानेला हिसके देत ताल धरू लागतो.अभंगाची पहिली ओळ उत्स्फूर्त येते.मग मात्र धर एक चरणाला पाच-एक सेकंद विचार करून माझा अभंग तयार होतो. अभंग तयार होतो म्हणजे फक्त यमकांची खटपट-शब्दांव्ही जुळवाजुळव! ...तबला वजवता वाजवता तोही रंगून जातो, अभंग गाता गाता मीही तल्लीन होऊन जातो!-
‘माझे माहेर कोल्हापूरी । आहे पंचगंगा तीरी॥१॥
माझी बहीण विजूताई। तिची सदा गदबड घाई॥२॥
बंडोपंत आहे बंधू । त्याची छाती काय सांगू॥३।
जनता जनार्दनी शरण । करी आहेरची आठवण॥४॥’
अभंग संपतो. कपिलला तो फार आवडतो. कारण त्यात त्याच्या मामीची चेष्टा असते ना!टाळ्या पिटून, ‘हो-’ असा आवाज काढून, मामीकडे पाहत तो आपला आनंद व्यक्त करतो. मला पुन्ह:पुन्हा तोच अभंग म्हणायचा आग्रह करतो. मीही त्याचा आग्रह मान्य करतो.‘मलाही हा अभंग शिकव की रे मामा’ म्हणतो.मग मी त्याला अभंग शिकवू लागतो...त्याची मामी माझ्याकडे पाहत डोळे वटारते. पण मी तिकडे लक्ष न दिल्यासारखे करतो. मग तो माझा अभंग जोराने म्हणू लागतो...त्याची मामी त्याला रागे भरू लागते. हलकीशी एक चापट-पोळीही देते...तो हिरसमुसला होतो. कधीकधी रडतोही. माझ्याकडे रागाने पाहत कोप~यात उभा राहतो. तूच मामीकडून मला मार खायला लावलास, ही त्याच्या नजरेतली जळजळीत भावना!मी दुष्ट. मनातल्या मनात हसत राहतो. माझ्यावर रागावलेल्या कपिलला पाहून, त्याच्यावर रागावलेल्या त्याच्या मामीलाही पाहून...
पण अभ्र पांगून प्रकाश बरसायला फार वेळ लागत नाही.‘आता तुला एक मस्तपैकी कथा सांगतो हं, सांगू की नको?’असं विचारलं की झालं!!
अलीकडे ही मोडक्य-तोडक्या कविता करू लागली आहे. कसे काय कुणास ठाऊक-पण मीही तशाच कविता करू लागलो आहे. कविता म्हणजे तशा कविता नव्हेत, उगीच आपले ट’ ला ‘ट’ आणि ‘री’ ला ‘र्री’ जुळवायचे. आपली एक गंमत म्हणून आणि तेही लहर लागई तर!परंतु याचा परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हा उभयतांचे व्यावहारिक संभाशणही प्रास-यमक-वृत्तबद्ध होत आहे. म्हणजे असे:
सर्व वारांमध्ये मला रविवारच अधिक आवडतो.कारण त्यादिवशी सखाळी खूप उशिरापर्यंत झोपायला मिळते. प्रत्यक्ष प्रेम करायला फार कमी मिळते, हा भाग वेगळा, पण माझे सर्वात जास्त प्रेमा कुणावर असेल तर तर ते झोपेवरच! रविवारी किंवा सुटीच्या दिवशी खूप खूप झोपायला मिळावे म्हणून मी आदल्या रात्री अर्धा-पाऊण पिंट राँकेल जाळतो. परंतु अजून तरी रविवारसकट सगळ्या सुटयांची स्थिती ना.सी.फडक्यांच्या ‘रविवार’ सारखीच झालेली आहे.पुढचा जन्म जर असेल, व तो जर मिळाला, आणि तशी ‘अनुकूल’ परिस्थिती सुदैवाने लाभलीच, तर उभे आयुष्यझोपून काढण्यचा माझा मानस आहे...
तर काय सांगत होतो मी? हां-सुटीच्या दिवशी मला उठायला किंचित उशीर होतो आहे, असे हिला वाटायला लागले, की माडीवर येते, आणि माझ्या तोंडावरची चादर हलक्या हाताने काढत म्हणते-
‘उठा, उठा हो मालक।
आला अंगणीं रविबालक।
भिंतीवरचे वाँलक्लाँक।
(‘भिंती्वरचे वाँलक्लाँ’ हं!)
काय कथिते परिसा तरी॥’
तिकडे रेडियोवर ‘मालवून टाक दीप’ लागले, की तो दीप मालवायच्या आत इकडेओळी तयार असत-
‘मालवून टाक लाईट,आँफ करून स्विच स्विच।
राजसा किती दिसात, जाहला तुला न लेट’
तिकडे ‘का हासला किनारा, पाहून धुंद लाट’ संपले की माझे इकडे तयार असते.‘पाहुनिया विहिरीला, का हासला रहाट’
या सा~याचा कपिलच्या टाळक्यावर एक वाईट्ट परिणाम असा होऊ लागला आहे, की आम्हाला हवे असलेले शब्द, यमक वगैरे आपल्या बालबुद्धीप्रमाणे तो आम्हाला पुरवू लागला आहे. ...
एकदा असेच झाले. सुटीच्या दिवशी मी माडीवर काहीतरी लिहीत बसलो होतो. दुपारचा एकचा सुमार असावा. स्वयंपाक करून ठेवून ही मला वरंवार ‘उठताय ना जेवायला?’, ‘येताय ना जेवायला?’ असे खालून विचारीत होती. मीही मान वर न करता तिच्या प्रत्येक प्रश्नाला ‘झालेच’, ‘आओच’ असे उत्तर देत होतो. पण माझे ते ‘झालेच-’ काही लवकर होत नव्हते, आणि ती दर सेकंदाला चिडत होती.....
काही वेळाने टपालवाल्याने तिचे नाव पुकारून पत्र टाकले. ती आनंदली. कारण पत्र माहेरचे होते. माडीच्या पाय~या चढत, ‘ओवी’ टोन मध्ये शब्द गुंफत ती म्हणाली-
‘उठा, उठा हो साहेब।’
पण गाडीचे चाक रुतले.पुढची ओळ काय टाकायची, ते तिला सुचेना. मात्र तिच्या पदराचे टोक धरून तिच्या मागून येणा~या कपिलने आपल्या बालबुद्धीने तिची अडलेली गाडी पुढे ढकलली. म्हणाला-
‘उठा, उठा हो साहेब। करा जोंधळ्याचा हिशोब॥’
जेव्हा तो राहायला म्हणून माझ्याकडे प्रथमच आला तेव्हा माझ्या काँलेजची मे महिन्याची सुटी अजून संपायची होती. त्यामुळे त्यची शाळा सुटल्यानंतर मी त्याला रोज संध्याकाळी फिरायला म्हणून माळावर नेत असे. मधल्या वाटेने-हिरवे , पिवळे पीक खेळविणा~या शेताच्या बांधावरील पायवाटेवरून!!
पहिल्याच दिवशी त्याने मला हे झाड कशाचे, ते झाड कशाचे, या फुलाचे नाव काय, त्या फुलाचे नाव काय, या पानाचा असाच का र्रं, त्या पानाचा तसाच का रंग, या शेताचे मालक कोण आहेत, तुझे शेत आहे की नाही- असे हज्जार प्रश्न करून हैराण हैरण करून सोडले...

कपिल / तीन

आता या दुनियेमधे जबाब देणा~या माणसांच्या संखेपेक्षा सवाल करणा~र्या माणसांचीच संख्या अधिक आहे, हे तर खरेच, शिवाय मोठया माणसांच्या तुलनेने ‘लहान माणसां’ चे सवाल अनंत आणि कधीही न संपणारे असतात, हेही खरे आहे. परंतु कपिलचे प्रश्न म्हणजे याच्याही पुढची एक पायरी! एक वेळ द्रौपदीची थाळी संपेल होईल, पण त्याच्या मनातील प्रश्न संपणार नाहीत. एकेकदा तो असले विचित्र प्रश्न करतो- साक्षात प्रश्नचिन्हाचा चेहराही प्रश्चिन्हांकित व्हावा!
आता हेच पहा ना! चंद्राला चंद्रच का म्हणतात आणि सूर्याला सूर्यच का म्हणतात? चांदणे म्हणजे ऊन नव्हे आणि ऊन म्हणजे चांदणे नव्हे- असे का? गाय म्हणजे म्हैस का नाही आणि म्हैस म्हणजे गाय का नाही?....काय डोम्बल उत्तर द्यायचे अशा प्रश्नांना?
वास्तविक चंद्राला चंद्र म्हणतात, म्हणून चंद्रालाच चंद्र म्हणतात किंवा म्हैशीला गाय म्हणत नाहीत म्हणूनच म्हैशीला म्हैस म्हणतात- हेच अशा प्रश्नांचे उत्तर!
पण नाही. त्याचे एवढया उत्तरावर समाधान होत नाही. त्याच्या प्रश्नरूपी चेह~याला आणखी काही तरी पाहिजे असते...
त्याची जिज्ञासूवृत्तीही तितकीच भयानक आहे. अगदी सुरुवातीला मला त्याच्या या जिज्ञासूवृत्तीचे आणि प्रश्नप्रवृत्तीचे कौतुक वाटायचे. कारण आजकाल, विशेषत: त्याच्या वयोगटातील मुलांमध्ये, अभावानेच आढळणा~या या वृत्ती आहेत, असे माझे प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्या त्या वृत्तीला जोपासण्याच्या आणि वाढविण्याच्या हेतूने मी त्याच्या प्रत्येक शंकेला, प्रश्नाला तो समाधानी होईल, अशा पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो....कधी त्याचे समाधान होते, कधी होत नाही, कधी कधी तर मीच थिटा पडतो त्याला उत्तर देताना!
बरे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नाही, माहीत नाही, असे म्हणण्याचीही सोय नाही. करण लगेच त्याचा प्रश्न तयार असतो-‘या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही म्हणजे असला कसला रे तू एम. ए. झालास?’ एम. ए. झालेला माणूस आणि सर्वज्ञानी परमेश्वर या दोहोंमध्ये त्याच्या दृष्टीने काहीच फरक नसावा!
एकदा त्याने मला विचारले, ‘मामा, क~हाड म्हणजे काय?’
मी उत्तर दिले, ‘ते एका गावाचे नाव आहे, का?’
‘पण कहाडच का नाव आहे?’
“ मला माहित नाही.”
‘एवढं सोप्प्प्प्पं आहे आणि तुला माहित नाही!”
“ होय.” मी शरणागतीचे हात वर केले.
“मी सांगू”
“सांग!”
“ अरे, तिथे सगळ्या कु~हाडीच आहेत रे!”
मला ‘क~हाड’ या शब्दाची व्युत्पत्ती माहीत नाही. पण ‘क~हाड’ या शब्दाची मूळ कु~हाडीत शोधणा~या त्याच्या कल्पकतेकडे मी पाहातच राहिलो. एकामागून एक नारळ वाढवावेत त्याप्रमाणे कुठल्याही शब्दाची ‘इटिमाँलाँजी’ तो अशी फटाफट फोडतो...

कपिल / चार

कोणत्याही लहान मुलाप्रमाणे कपिलालाही कथा ऎकायला फार आवडतात. पण यात काही विशेष नाही. ‘कथा’ या सदराखाली काय वाट्टेल ते जुळवून ठोकले, तरी तिचा तो आनंदाने स्वीकार करतो. पण आंधळा स्वीकार करत नाही. मुख्य म्हणजे तो कथा लक्ष देवून नीट ऎकत असतो. कथाकथनकाराने विसरलेला एखादा संदर्भ, दुवा तो ‘आँन दी स्पाँट’ कथाकथनकाराच्या ध्यानात आणून देतो. कथानकात राहिलेले ‘कच्चे धागे’ तो अचूक पकडतो आणि निदर्शनास आणून देतो. एखादी अवघड कविता शिस्तीत, व्यवस्थित समजावून घ्यावी त्याप्रमाणे तो कथा समजावून घेतो. कथा सांगणा~याची तो कोणतीही हातचलाखी वा लपवाछपवी खपवून घेत नाही. मग त्या ‘कथे’ त काही तथ्य असो किंवा नसो!
त्याच्या मनावर काही संस्कार व्हावेत, कथा ऎकण्याची गोडी आहेच, पण कथा सांगण्याचीही गोडी त्याच्या मनात निर्माण व्हावी म्हणून गाण्याप्रमाणेच आमचा ‘कथाकथना’ चाही कार्यक्रम ठरून गेला आहे. वेळ: रात्रीच्या जेवणाची. स्थळ: स्वयंपाकघराचा ‘वरचा कट्टा’. कथाकथनकाराची भूमिका कधी माझ्याकडे तर कधी त्याच्या मामीकडे. कधी कधी आम्ही सांगितलेली कथा त्यालाच पुनश्च सांगायला लावतो. पण त्यात काही त्याने अजून विशेष रस घेतलेला दिसत नाही. पण श्रवणभक्ती मात्र अगदी दृष्ट लागण्यासारखी, काढण्यासारखीही!
कपिलच्या मामीने सांगितलेला जी.एं. चा ‘खुळा बाळ्या’ त्याला जाम आवडला.त्यांचीच ‘शेपटी’ची कथाही त्याला खूप आवडली. परंतु त्याची हंसून हंसून खरी मुरकुंडी वळली ती मी सांगितलेल्या ‘लांब नाकाच्या गोष्टी’ ने! त्या कथेतल्या राजकन्येचे नाक वाढत वाढत जावून दूरवरच्या एका डोंगरावर जावून टेकते किंवा राजकन्या ‘नाही’, ‘नाही’ अशा अर्थाने मान हलविते व तिचे नाक पाहावयास आलेल्या दरबारी मंडळींतील काही मंडळी पायात दोरी अडकल्याप्रमाणे तिचे वाढलेले, वाढत जाणारे नाक अडकून एकमेकांच्या अंगावर धपाधपा पडतात- हा प्रसंग ऎकताना तर त्याचे हंसणे इतके अनावर झाले, की तो पानावरूनच उठला!
कितीतरी वेळा त्याने मला हीच कथा सांगायला लावली आहे आणि मी ही ती सांगितली आहे...
पण एकदा मात्र त्याने मला त्या कथेवरची आपली एक शंका विचारली आणि हाता-पायाची मिळून अख्खी वीसच्या वीस बोटे तोंडात घालण्याची पाळी माझ्यावर कोसळली! आपले गळके नाक पुसत पुसत त्याने प्रश्न केला होता- ‘ मामा, त्या राजकन्येचे नाक इतके लांब होते म्हणतोस, तर ती शेंबूड कसा काढत होती रे?’
मी मनोमनीं त्याच दिवशी ठरवून टाकले: कपिलला घेऊन मुद्दाम धारवाडला जायचे. तेही लवकरात लवकर! तो मोठा व्हायच्या आत. कारण त्याच्या प्रश्नाचे उत्तर फक्त जी.ए. च देवू शकतील!!...

कपिल / पाच

एकदा काय झाले, माडीवर मी कोणतेसे पुस्तक वाचीत बसलो होतो. माझ्या शेजारीच त्या दिवशीचे वर्तमानपत्र पडले होते.
थोडया वेळाने ‘मामा’, ‘मामा’ कारीत स्वारी आली. आणि वर्तमानपत्राकडे जाताच त्याच्या जवळ बसली. वर्तमानपत्रातील फोटो, चित्रे, मागच्या पानावरील सिनेमाच्या-नाटकाच्या जाहिराती पाहू लागली आणि त्यातच रंगून गेली...
तेवढयात त्याचे चित्त पहिल्या पानावरील एका फोटोने वेधून घेतले. त्या फोटोचे त्याचे सूक्ष्म निरीक्षण सुरू झाले.त्याला तो फोटो खूप आवडला असावा आणि त्या फोटोबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले असावे. कारण एक गुडघा पेपरवर ठेवून लंगड्या बाळकृष्णाच्या पोझमध्ये त्याने मला प्रश्न केला,
‘ मामा-मामा, हा फोटो कुणाचा रे?’
‘खाली नाव लिहिले आहे बघ, ते वाच-’मी हातातील पुस्तक मिटवत उत्तरलो
‘रा-रा- राष्ट्र-राष्ट्रप-राष्ट्रपती! एकेक अक्षर जुळवीत त्याने ‘राष्ट्रपती’ हा शब्द वाचला आणि मला प्रश्न केला, ‘ मामा, राष्ट्रपती म्हणजे काय रे?’
जाता जाता तेवढीच त्याला माहिती मिळावी, त्याच्या सामान्यज्ञानात भर पडावी या भावनेने मी त्याला सोप्या शब्दात सांगू लागलो, ‘यांना राष्ट्रपती म्हणतात. हे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती-म्हणजे मुख्य आहेत. यांचे नाव झैलसिंग असे आहे-ग्यानी झैलसिंग! आहे की नाही लिहिलेले खाली?’
मग त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली- त्यांनी दाढी का वाढविली आहे, त्यांचे नाव असले का आहे, तू का दाढी राखत नाहीस, आपल्याला राष्ट्रपती होता येईल काय, त्यासाठी कितवीपर्यंत शिकावे लागते, शंभरावीपर्यंत की हजारावीपर्यंत... वगैरे
त्याला समजेल अशा भाषेत मीही त्याचे समाधान केले.
पण तरीही त्याचे समाधान झाले नसावे.त्याने मला फिरून तोच प्रश्न केला, ‘ खरं मामा, राष्ट्रपती म्हणजे नक्की कोण?’
क्षणभर मी गोंधळलो. त्याला नेमके काय उत्तर द्यावे ते मला समजेना. पण लगेच सुचले. म्हणालो, ‘अरे, राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा पती, म्हणजे प्रमुख!!’
‘म्हणजे राजाच म्हण की!’ त्याने आपल्या परीने अर्थ घेतला.
‘करेक्ट! अगदी बरोबर! राष्ट्रपती म्हणजे राजाच. तोच राज्याचा मुख्य असतो!’
आपल्या उजव्या हाताच्या अंगठयाजवळचे बोट राष्ट्रपतींच्या फोटोवर ठेवून त्याने पुन्हा पृच्छा केली. म्हणाला,
‘ म्हणजे हा आपल्या भारत देशाचा राजा आहे?’
‘ हो, आणि हे बघ-’ थोरामोठयांबद्दल कसे आदराने बोलायचे असते, ते त्याला समजावे म्हणून मी त्याला म्हणालो, ‘ यांना ‘हा’ असे म्हणायचे नाही, ‘हे ’ असे म्हणायचे’
‘का?’
‘अरे, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. आपल्यापेक्षा मोठया माणसांना ‘अहो-जाहो’ म्हणायचे असते. तू तुझ्या बाबांना ‘अरे-जारे-’ असे म्हणतोस काय?’
‘नाही’
‘का?’
‘कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत.’
‘शाळेतल्या बाईंनाही तू ‘अहो, बाई’ असेच म्हणतोस की नाही?
‘होय’
‘की ‘ए बाई’ असं म्हणतोस?’
‘नाही-नाही-’ तो खळखळून हंसू लागला. कारण त्याच्या बाईंना मी ‘ए बाई’ असे म्हटल्यामुळे त्याला गंमत वाटली.
‘मग? आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना आदराने बोलावे, समजलं?’
माझ्या प्रश्नाने तो निरुत्तर झाला.
पण क्षणभरच! कारण त्याच्या पुढच्या प्रश्नाने मलाच कायमचे निरुत्तर केले.
‘पण मामा,’ त्याने प्रश्न केला,‘ तू माझ्यापेक्षा इतका मोठा आहेस, मी कसं रे तुला ‘अरे-जारे’ म्हणतो? आणि तूही कसं ऎकून घेतोस?’
आकाशीच्या चंद्राला ‘चंद्राकाका’, ‘चंदाकाका’ न म्हणता ‘चंदामामा’, ‘चांदोमामा’ म्हणणा~या लहान बालकाच्या कोवळ्या ह्रुदयातील नाजूक भावना मी जाणतो, पण त्या कशा व्यक्त करायच्या आणि तेही या सात-आठ वर्षांच्या चिमुरडया पोरापुढे!!
असाच PÀकितीतरी वेळ गेला. तो काय करतो, ते पाहावे म्हणून मी हळूच पुस्तकातून डोळे बाहेर काढले. तर बहाद्दराचे डोळे अजून राष्ट्रपतींच्या चित्रावरच खिळलेले होते. माझे पाहणे त्याच्या लक्षात आले असावे. लगेच त्याचे प्रश्नोपनिषद सुरू झाले-
‘म्हणजे मामा, या राजांकडे राजवाडा आहे?’
‘हो, आहे ना!’
‘कुठे?’
‘दिल्लीला! दिल्लीला आपल्या देशाची राजधानी म्हणतात!’ त्याला एक चमचाभर सामन्यज्ञान पाजण्याचा मोह मला आवरता आला नाही.
‘हां, हां-’ असे म्हणत त्याने आपली मान हलवली, आणि पुन्हा तो त्या फोटोकडॆ पाहू लागला. डोळे बारीक-मोठे करीत...
बहुतेक स्वारी कसलातरी मोठा विचार करते आहे, हे मी चेह~यावरून ताडले.
आपले दोन्ही डोळे अधिक मोठे करून माझ्याकडे पाहत त्याने विचारले, ‘मामा, म्हणजे या राजांकडे सैन्य आहे?’
‘हो, आहे ना!’
‘खूप मोठ्ठं आहे?’
‘हो, खूप खूप मोठठं आहे!’
‘ म्हणजे आकाशाएवढं? त्याने दोन्ही हात घारीच्या पंखासारखे पसरून आकाशाचे मोठेपण दाखवले.
‘हो, हो-’
‘आणि तलवारी, ढाली, भाले-?’
‘हो, त्याही आहेत ना!’
‘खूप?’
‘हो, अगदी खूप-खूप! आणि बरे का, या आपल्या राजांचे सैन्य खूप म्हणजे खूप शूर आहे! राजांनी सैन्याला आज्ञा दिली, की सैन्य लढाईला जाते आणि एका मिनिटात शत्रूचा पराभव करून येते. हा-साधे सैन्य नाही ते!’
शत्रूच्या पराभवाच्या कल्पनेने त्याच्या चेह~यावर विजयानंद झळकू लागला!
पण पुढच्याच क्शणाला काय झाले कुणास ठाऊक! त्याचा चेहरा एकदम पालटला. तो माझ्याकडे वाईट डोळे करून पाहू लागला. त्याच्या नजरेत संताप होता. चीड होती. आरोप होता. तो थरथरू लागला. आपल्या परमविश्वासातली एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी महत्वाचे सांगत असावी, आपण जिवाचा कान करून ते ऎकत असावे, आणि- आणि आपल्याला ती व्यक्ती काहीतरी खोटे सांगून फसवत आहे, अशी जाणीव होऊन एकदम आपण त्या व्यक्तीवर भडकून उठावे, तसा तो माझ्यावर जळजळीत भडकला. म्हणाला, ‘सेनापती रे, सेनापती सैन्याला आज्ञा देतो, राजा नव्हे!!’

कपिल / सहा

कपिलचे डोके जसे गाण्यात चालते तसे चित्रकलेत मात्र अजिबात चालत नाही. परंतु त्याने चित्रकला शिकावी, त्याला चित्रेही काढता आली पाहिजेत, त्या बद्दल त्याच्या मनात आवद निर्मान झाली पाहिजे-ही आम्हा उभयतांची तीव्र इच्छा! त्यासाठी मुद्दम तिने त्याला सहज पुसता येण्यासारखी कोल्हापूरहून ‘मँजिक स्लेट’ आणून दिली. पेन्सिल, खोडरबर, रंगपेटी, को~या कागदाची वही, पेन्सिलीला टोक करण्यासाठी ‘गिरमिट’-सर्व काही आणून दिले. पण व्यर्थ!
मग ही एकदा त्याला म्हणाली,‘ हे बघ, तुला परीक्षेत पुढे प्राण्यांची म्हण, भांडयांची म्हण, फुला-प्राण्यांची, पक्ष्यांची-अशी वेगवेगळी चित्रे काढावी लागणार आहेत की नाही?’
‘हो-’
‘मग तुझी तुला स्वतंत्र चित्रे काढायला आली पाहिजेत. जे जे चांगले आहे, ते ते सर्व आपल्याला आले पाहिजे रे! आले पाहिजे की नको?’
‘आले पाहिजे..’
‘ मग त्यासाठी तुला शिकले पाहिजे. होय की नाही?’
‘होय, पण-पण मला येत नाहीत की!’ त्याचा रडवा सूर.
‘येत नाही, म्हटले की येतच नाही. आणि हे बघ, कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला ‘येत नाही’ असे म्हणू नये. ‘येतेच’ म्हणावे! अरे, कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय कशी येणार, तूच सांग! तुला अगोदर गणितं येत होती काय वजा-बाकीची?’
‘नाही’
‘पण आता येतात की नाही?’
‘येतात,’
‘मग ती शाळेतल्या बाईंनी, मामांनी, मी शिकवल्याशिवाय, आणि मुख्य म्हणजे तू स्वत: शिकल्याशिवाया आली काय?’
‘नाही,’
‘मग? अरे, शिकायचे! कुठलीही गोष्ट शिकायला नाही म्हणू नये! शिकल्याशिवाय कुठलीच गोष्ट येत नाही-येते?’
मामीच्या प्रश्नाला तो नकार्थी मान हलवी. कारण त्याला सगळे पटत असे. कळत असे. पण अजून तरी त्याची स्थिती ‘तुज कळते परि ना वळते’ अशीच आहे. कदाचित चित्रे काढायला त्याला आवडत नसावे. किंवा ‘चित्रा’ तल्या चित्राप्रमाणे आपली चित्रे दिसत नाहीत, म्हणून नाराज होऊन कदाचित चित्रे काढण्याबद्दल त्याच्या मनात नावद निर्माण झाली असावी! कारण ‘रेडियोतल्या माणसांप्रमाणे मला गाणे म्हणता का येत नाही?’ किंवा ‘मला त्यांच्यासारखे का गाणे म्हणता येत नाही?’ वा ‘पुस्तकातल्या अक्षरांप्रमाणे मला का लिहिता येत नाही?’ यांसारखे तो नेहमी प्रश्न करतो आणि ‘रोज प्रँक्टीस केली की येते’, असे उत्तर दिले की त्याला पटते.
मग ‘तांब्या’ घेऊन जातानाही तो ‘पंढरी’ ला जातो!
अर्थात, गण्याची गोष्ट निराळी आणि चित्रांची गोष्ट निराळी! म्हणून वाटते, की मुळातच त्याच्या मनात चित्रे काढण्याबद्दल प्रेम नसावे!
पन असे असले तरी वेगवेगळी चित्रे जमविण्याची, चित्रे पाहण्याची आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे आपल्याला आवडणारी चित्रे दुस~यांकडून काढून घेण्याची त्याची हौस मात्र दांडगी आहे. गेल्या जन्मात तो कोणत्या संस्थानचा संस्थानिक होता कुणास ठाऊक!
-आणि त्याच्या आवडीच्या चित्रांमध्ये अधिकाधिक चित्रे कुणाची चित्रे असतात माहीत आहे? त्याचे बाबा पोलीस खात्यात आहेत म्हणूनही असेल कदाचित- पण पोलिसांची!! पोलिसांना घाबरून चोर पळताहेत, चोरांच्या मागे पोलीस धावताहेत. पोलिसांच्या हातात पिस्तुल्स आहेत. आणि ते पिस्तुलातून सटासटा गोळ्या झाडताहेत! बस्स- हीच त्याची आवडती चित्रकल्पना!
या चित्रबद्दलचे प्रेम त्याच्या खेळावरील प्रेमातून झाले असावे, असा माझा तर्क आहे. कारण त्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात, अर्थातच चित्र सोडून, त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे खेळ! शेजारच्या चार-पाच मित्रांना जमवून संध्याकाळच्या वेळी व सुटीच्या दिवशी तो नाना खेळ खेळतो. साधारणपणे प्रत्येक खेळाची साधने जरी वेगवेगळी असली तरीकोणताही खेळ खेळताना तो त्या त्या खेळाच्या विशिष्ठ साधनांसाठी तो अडून बसत नाही. क्षणात क्रिकेटचा रबरी बाँल ‘हाँलीबाँल’ बनतो, हाच हाँलीबाँल दुस~यादिवशी ‘फुटबाँल’ बनतो, क्रिकेटच्या बँटची ‘हाँकी-स्तिक’ बनते...
पण सर्व खेळांत आवडीचा-अत्यंत आवडीचा खेळ म्हणजे - चोरशिपाई!
चार चोर आणि दोन-तीन शिपाई! चोर चोरी करतात. मग शिपाई चोरांना शोधू लागतात. शोध-शोध-शोधतात. आपण सापडणार असे दिसताच चोर पळू लागतात. शिपाई चोरांचा पाठलाग करू लागतात. शिपाई चोर न सापडल्याचे नाटक करतात....शेवटी शिपाई आपल्या हाताच्या पंजाच्या ‘खोटयाखोटया’ पिस्तुलातून तोंडाने गोळ्या झाडतात. पाचपन्नास खोटेखोटे चोर खरेखरे मरतात. मग ‘खरे खरे’ चोर जखमी होतात. शिपायांच्या हाती सापडतात. मग हातात खोटयाखोटया बेडया ठोकून खोटयाखोटया चोरांची खोटयाखोटया तुरुंगात खोटीखोटी रवानगी होते...
आणि हो, हे खोटेखोटे शिपाई खोटीखोटी का असेना, पण ‘व्हिस्की’ ही पितात बरं का! ¥À¥Àपण जेचा त्यांचे ‘व्हिस्की प्रकरण’ हिला समजले तेव्हा हिने त्या शिपायांना चांगलाच दम दिला. तेव्हापासून त्या शिपायांनी खोटीखोटी व्हिस्की खोटीखोटी पिण्याचे कायमचे सोडून दिले...पण खोटेखोटे नाही हं! अगदी ‘खरे-खरे’ च सोडून दिले!

कपिल / सात

एकदा तिन्हीसांजेला जुन्या वाडयातल्या मालूकाकी घरी आल्या होत्या. मालूकाकी आल्या आणि चुलीपुढे बसलेल्या हिच्यापुढे बसून बोलत बसल्या...
कपिल देवापुढे बसून रोजच्याप्रमाणे संध्या करीत होता. मी त्याच्यामागे पण काही अंतरावर पोते टाकून कसला तरी हिशोब करीत बसलो होतो.
कपिलने आपली संध्या आटोपली. ताम्हणातले पाणी अंगणातल्या तुळशीकट्ट्यात टाकून तो पुन्हा देवासमोर येऊन बसला. आणि छातीला हात जोडून खडया आवाजात ‘शुभंकरोति’ म्हणू लागला...
‘शुभंकरोति’ झाली, ‘कृष्ण म्हणे मातेला... कुमकुममंडित जनके...तू सागर करुणेचा..गरुड जसा गगनातुनि...’ अशा त्याच्या आजोबांनी शिकविलेल्या मोरोपंतांच्या आर्या झाल्या....
मग त्याने रामरक्षा सुरू केली...
काही वेळाने मला जाणवू लागले, की त्याच्या आवाजाचा ‘व्हाल्यूम’ कमी कमी होऊ लागला आहे. रामरक्षेकडे त्याचे लक्ष नाहीय. पेंगुळलेल्या विद्यार्थ्याने जांभई देत पाढे म्हणावेत त्याप्रमाणे एकच श्लोक तो दोन-दोन, तीन-तीन वेळा म्हणतोय. म्हणताना काही श्लोक तो एकदम पुढे तरी जातोय किंवा मागे तरी येतोय.....
रोज खणखणीत खडगाच्या आवाजात रामरक्षा म्हणा~या आज याला काय झाले, असा मनात विचार येऊन मी त्याच्याकडे पाहिले...
तर महाराजांचे सगळे लक्ष चुलीकडे होते. डोळे विस्फारित करून व कान मांजरासारखे टवकारून तो मालूकाकींकडे पाहत होता. त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऎकत होता...
मालूकाकी गावात नुक्त्याच कुठे कुठे झालेल्या चो~यांबद्दल बोलत होत्या...
‘कपिल,’ मी त्याला भानावर आणत म्हणालो, ‘ कुठे आहे तुझे लक्ष?’
मग तो नीट बसला. पुन्हा पूर्वीसारखे हात जोडून समोर पाहत रामरक्षेचे पुढचे श्लोक म्हणू लागला...
जेवणे झाल्यावर अंथरूण घालण्यासाठी म्हणून मी माडीवर जाणार तेवढ्यात तो गयावया केल्याप्रमाणे म्हणाला,
‘मामा, मामा, एक चित्र काढून दे की रे मला!-’
‘आत्ता? आत्ता नाही बाबा! माझा अभ्यास आहे. उद्या काढून देतो-हं?’
‘जा, बाबा-’ त्याचे तोंड चिमणीच्या पिलाएवढे झाले!!
कपिलची आणि माझी राश एकच असल्यामुळे असेल कदाचित, पण कोणत्याही कारणासाठी त्याला नाराज करणे, त्याचे हिरमुसले रूपडे पाहणे माझ्या जिवावर येते. मी त्यच्यावरच इतका का जीव टाकतो आणि तोही ‘मामा’, ‘मामा’ करीत माझ्याच मागे का लागतो, हे मला अजून समजलेले नाहीय!
ही जेवायला बसायची होती. म्हटले, हिचे जेवण आटोपून, उष्ट-शेण होईपर्यंत त्याला एखादे चित्र काढून द्यावे. मग मी फळीवरच्या डब्यातील खडूचा एक तुकडा घेतला आणि जमिनीवर बसत त्याला विचारले,
‘हं- सांग! कुणाचे चित्र काढू? बैलाचे काढू?’
‘नको-“
‘मग घोडयाचे काढतो, मस्तपैकी! हं?’
‘घोडयाचे....’ त्याने काही क्षण विचार केला आणि लगेच म्हणाला,‘ नको-नखो! घोडयाचे नको.’
‘मग कुणाचे काढू? तूच सांग!’
मी त्याच्या उत्तराकडे पाहू लागलो. खूप विचार करून बोलल्याप्रमाणे तो म्हणाला, ‘पोलिसाचं काढ!’
मग मी जमिनीवर एका पोलिसाचे चित्र काढले. पण त्या पोलिसाचे हात रिक्त राहून गेल्याचे पाहून तो म्हणाला,‘अरे, याच्या हातामध्ये पिस्तूल दे की रे, मामा! काय बाबा तू...’
मग मी पोलिसाच्या हातात एक पिस्तूल दिले.
‘आता एक चोर पळतोय असं काढ.’
मग मी पळणारा चोर काढला. एवढेच नव्हे तर त्या पोलिसाच्या हातातील पिस्तुलातून तीन-चार गोळ्या पळणा~या चोराच्या दिशेने मीच उडवल्या..
चित्र पाहून, त्यातही चोर पोलिसाला घाबरून पळतो आहे, हे पाहून तो खूष खूष होऊन गेला. टाळ्या पिटत, उडया मारीत आनंदाने नाचू लागला...
पण मध्येच एकदम गंभीर होऊन त्याने काळजीच्या सुरात विचारले,
‘मामा, आता आपल्या घरी चोर येणार नाहीत ना?’
‘अजिबात नाही!’ मी ठामपणे त्याला सांगितले. हो, उगीच रात्रीअपरात्री घाबरून उठायचा. त्यात पुन्हा मालूकाकींनी तासाभरापूर्वीच सांगितलेल्या च्रोरांच्या हकीकती.
‘पण का येणार नाहीत चोर आपल्या घरी?’
त्याला माझ्याकडून आणखी ‘सेक्युरिटी’ हवी असलेली दिसली. म्हणालो,‘अरे, हा पोलिस आहे की! ’
‘आणि आले तर?’
‘ तर-तर, हा पोलिस त्या चोरांना या चोरासारखे पळवून लावील.’
माझ्या उत्तराने त्याचा चेहरा एकदम निश्चिंत झाला...
कितीतरी वेळा तो त्या चित्राकडे टक लावून पाहत होता.चित्र पाहत असताना त्याच्या चेह~यावर नाना भाव तरळून जात होते. चिमणीच्या प्रकाशातही मला ते स्पष्ट जाणवत होते.पळणा~या चोराला गोळी लागली आहे की नाही, की नुसतीच चाटून गेली अहे, हेही तो पाहत असावा!
दुपारीच स्वच्छ सारविलेली जमीन अस्वच्छ केल्याबद्दल दोघांवरही रागावलेली त्याची मामी जेव्हा ते चित्र फडक्याने पुसू लागली तेव्हा तर त्याने ‘भो,,’ करून भोकांडच पसरले. काही म्हणजे काही केल्या तो तिला ते चित्र पुसू देईना....चित्र पुसून टाकले आणि रात्री चोर आले तर? मग गोळ्या कोण झाडणार? आपण तर माडीवर असणार..तेही झोपेत! यासारखे तो प्रश्न करू लागला. त्याने तर चित्र पुसू पाहणारे हिचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले...
शेवटी ‘मामा-भाचे काय वाट्टेल ते हाका मारा’ असे पुटपुटत ही माडीवर निघून गेली.
राहून राहून मला कपिलच्या भोळ्या-भाबडया श्रद्धेचे हंसू येत होते...
बाकी त्या तरी हंसण्याचे काय कारण आहे म्हणा! कारण आपणही त्याच्यासारखेच आहोत नाही का? फक्त चौकटीतले चित्र तेवढे बदलायचे! पोलिसाऎवजी राम-कृष्ण-महादेव-मारुती किंवा लक्ष्मी-विठोबा-विष्णू-गणपती!!

कपिल / आठ

रोज माझे काँलेज दुपारी दीड वाजता सुटते आणि शेतातून गेलेल्या मधल्या पायवाटेने घरी पोहोंचायला मला साधारणपणे पावणे दोन होतात.
पण त्या दिवशी मी जेव्हा घरी आलो तेव्हा बरोबर सव्वा साडे अकरा वाजले होते. ‘मुंबई - ब’ वरचा कामगार कार्यक्रम संपत आला होता.
‘आज लौकर मास्तर?’ पागेत राहणा~या येसूकाकांनी विचारणा केली.
‘होय, शेख अब्दुलाह गेले ना, त्यासाठी...’ मी खुलासा केला.
जिन्याखालच्या कोप~यात चपला सरकावून मी माडीवर गेलो. कपिल माडीवरच होता. भिंतीकडे तोंड करून उभा. शांत. चूप. थोडासा गंभीरही.
माझ्या आगमनाची त्याने यथायथाच दखल घेतली.
मला आश्चर्य वाटले! कारण रोज असे होत नसे. जरी त्याच्या शाळेची आणि माझ्या शाळेची सुरू होण्याची आणि सुटण्याची वेळ जरी परस्पर विरुद्ध असली तरी जेव्हा जेव्हा आम्हा दोघांच्या गाठी-भेटी होत तेव्हा तेव्हा त्याची मनस्थिती उत्फुल्ल असे. त्याच्या अथवा माझ्या एखादी ‘गंमत’ म्हणून सांगण्याने, त्याच्या एखाद्या प्रश्नाने, शंकेने आमच्या संभाषणाला सुरुवात होत असे. कधी कधी शाळेतील मित्रमंडळींच्या तक्रारीही तो मांडे. आज बाईंनी शाळेत कोणती कविता शिकविली, कोणता धडा घेतला, किंवा आज बाईंनी घरात जुन्या कपडयांवर कोणती वस्तू घेतली अथवा गावात चावडीजवळ कोणत्या पक्षाची गाडी अडवली-असेही विषय बोलण्याचे प्रारंभ असत. घरात पाय ठेवल्याबरोबर काहीतरी सांगण्यासाठी वा विचारण्यासाठी म्हणून दूध मागणा~या मांजरीच्या बालपिलाप्रमाणे तो माझ्याभोवती घोटाळत असे...
पण आज मात्र यांपैकी काहीच घडले नव्हते. मी विचार केला: बहुतेक मामीशीच स्वारीचे काहीतरी बिनसलेले असावे!
अंगावरचे कपडे काढता काढता, त्याची कोमजलेली कळी खुलविण्यासाठी म्हणून मला आश्चर्य वाटल्याच्या ावाजात मी प्रश्न केला,
‘अरे? तू आज शाळेला गेला नाहीस?’
‘गेलो होतो’ अत्यंत पडेल आवाजात त्याने उत्तर दिले.‘ पण बाईंनी आज सुटी दिली..’
‘सुट्ट्ट्ट्टी?’ सात मजली चकित झाल्याच्या आविर्भावात मी त्याला पुन्हा प्रश्न केला,‘ का? आज का बाबा सुट्टी?’
डोळे बारीक करून, त्याच्या डोळ्यात खोल पाहत गंभीरपणे विचार करीत असल्याचा मी बहाणा करू लागलो. कारण मला त्याच्या चेह~याचा पोच काढायचा होता!
‘ते कोण आहेत की रे ते,’ हळूहळू त्याचे ओठ सैल होऊ लागले, ‘त्यांचे निधन झाले म्हणे!’
आपल्या उत्तरात त्याने ‘निधन’ हा शब्द वापरल्यामुळे मला त्याचे विशेष कौतुक वाटून गेले. पण एवढयवरच खूष न होता मी लगेच ‘पेडगाव’ च्या गाडीत बसलो.
‘निधन? निधन म्हणजे काय बुवा!’
‘निधन म्हणजे काय ते तुला माहीत नाही? एवढा मोठ्ठा झालास आणि...’
‘थु: तुझ्या मारी’ च्या टोनमध्ये त्याने मलाच प्रतिप्रश्न केला.
मला बरे वाटले. कारण आता त्याच्या चेह~य्वरील अपेक्षित बदलांना सुरुवात होत होती.
‘नाही-निधन म्हणजे...काय बरं...’ मी पेडगावच्या स्तँडवर उतरलो.
तो चिडक्या आवाजात म्हणाला, ‘ निधन म्हणजे वारले रे...’
‘हां-हां! आत्ता लक्ष्यात आले-पण कुणाचे?’
माझ्या गोंधळलेल्या चेह~याकडे पाहून तोही गोंधळला. विचार करू लागला. आठवण्याचा प्रयत्न करू लागला....त्याचा चेहरा पालटू लागला...डोळ्यांचे आकुंचन-प्रसरण होऊ लागले. ऒठ थरथरू लागले. पण शब्द काही फुटेनात!
असाच काही वेळ गेला. आणि त्याचे डोळे एकदम चमकले. त्याला काहीतरी आठवले. त्याला जे काही आठवले होते ते त्याच्या तोंडातून अस्पष्टसे उमटू लागले-
‘ ते,हे रे, काश्मिर-काश्मिरचे...’
आणि तो तिथेच अडकू लागला. त्याच्या जिभेची ‘पिन’ काही पुढे सरकेना. काही केल्या त्याला ‘शेख अब्दुल्लाह’ हे नाव काही आठवेना...
अर्थात माझीही त्याच्याकडून ती अपेक्षा नव्हतीच. कारण आतापर्यंत त्याने जे सांगितले होते, आणि मुख्य म्हणजे ज्या पद्धतीने सांगितले होते, तेच त्याच्या वयाच्या मानाने भरपूर होते.
मग मी त्याला, तेवढीच त्याच्या सामान्यज्ञानात भर, या भावनेने, अगदी थोडक्यात काश्मिरबद्दल सांगितले. त्याने लक्षपूर्वक मी सांगितलेले ऎकले आणि हळूहळू त्याच्या ओठांना शब्दांचा मोहर सुटला व सर्वत्र प्रश्नगंध दरवळू लागला... काश्मिर म्हणजे काय, ते कुठे आहे, त्याचे नाव काश्मिरच का आहे, तिथेही शाळा आहे काय,
आमच्यासारख्या नंदाबाई आहेत काय, तिथे सारखे बर्फ का पडते, तिथल्या मुलांना रोज बर्फाचे ‘आयस्क्रिम’ खायला मिळते काय, आपण काश्मिरला केव्हा जायचे, काश्मिरला जहाज का जात नाही, आणि आपण जर नेले, तर काय होते-वगैरे.वगैरे.
पाकळीपाकळीने फूल उमलावे तसा तो हळूहळू उमलू लागला...
लुंगी गुंडाळताना ‘मग काय, चैन आहे बाबा तुझी!’ अशा आशयाने मान व डोळे उडवित मी त्याला विचारले,
‘मग काय बाबा, मजा आहे तुझी! आज सुट्टी !’
माझ्या प्रश्नाने त्याचा चेहरा खर्कन उतरला. तो पूर्ववत गंभीर झाला. रागमिश्रित चिडक्या चेह~याने व एखाद्याची समजूत काढल्याप्रमाणे तो मला म्हणाला आणि मी चाटच पडलो! तो म्हणाला, ‘ सुट्टी आहे, खरं ती काही हसायची सुट्टी नाही, निधनाची सुट्टी आहे...’

कपिल / नऊ

कपिलला चुटकी सुंदर वाजविता येते, आणि दहा वजा चार सत्तावीस भागिले तीन यासारखी गणिते तो चुटकीसरशी करतो. पण लेखी गणित म्हणजे त्याच्या लेखी क्रमांक एकचा दुश्मन!
एकदा ही मला म्हणाली, ‘रोज आठ अधिक चार, बारा वजा चार असलीच गणिते शिकवू नका त्याला. लेखी गणितही घाला. त्या गणितांचीही त्याला सवय झाली पाहिजे...’
मग मी त्याला एक गणित घातले: एका झाडावर वीस आंबे आहेत. त्यांपैकी पाच आंबे पाडाला आले आहेत, तर झाडावर किती कच्चे आंबे आहेत?
झाले! कुरुक्षेत्रावर समोरची कौरव-सेना पाहताच अर्जुनाने जसे हातातील ‘गांडीव’ खाली ठेवले तद्वत कपिलने हातातली पाटी खाली ठेवली. म्हणाला,
‘मी काही नाही जा, बाबा!’
‘का रे? काय झाले?’
‘मला असली गणितं नकोत...’
‘मग कसली पाहिजेत?’
‘दहा वजा बारा, तीन अधिक चाळीस-असली.’
’अरे, पण तुला असलीही गणितं आली पाहिजेत.’
‘का?’
‘कारण परीक्षेत असलीही गणितं विचारतात’
‘होय?’
‘मग? कर आता-’
मग त्याने पाटी हातात घेतली. पण काही वेळ तो थंडच बसला. पाटीवर टकटक करीत...
मी म्हटले, ‘गणित मोठ्ठयाने वाच. मोठठ्याने वाचले, की समजते...काय करायचे आहे, काय विचारले आहे ते...’
त्याने अथपासून इतीपर्यंत गणित वाचले.
‘छान! हं, सांग आता! गणितात काय काय सांगितले आहे?’
‘एका झाडावर-’ एका श्वासात त्याने सगळे गणित वाचले.
‘बरोबर, आता सांग, गणितात काय विचारले आहे?’
‘एका झाडावर-’ तो पुन्हा झाडावर चढला.
‘बरोबर, मग आता काय केले पाहिजे?’
‘आता गणित केले पाहिजे’
‘बरोबर, गणितात काय सांगितलेले आहे?’
‘एका झाडावर-’
‘सगळे गणित वाचू नको’ मी थोडासा माझा आवाज चढवला. कारण माझ्या प्रत्येक प्रश्नाला तो ‘झाडावर-’ नेत होता.
तो विचारवंतासारखा विचारमग्न झाला. एकदा माझ्याकडे, एकदा पाटीकडे-असा पाहत बसला.
‘आता मला सांग, झाडावर एकूण किती आंबे आहेत?
‘पन्नास-’ त्याने ओरडून सांगितले.
‘अगदी बरोबर, आता सांग-पाडाला आलेले आंबे किती आहेत?’
‘पाच.’ तो पुन्हा ओरडला.
‘छान! आणि असं भुंकू नको, हं-आता आपल्याला कोणती संख्या काढली पाहिजे?’
‘कच्च्या आंब्यांची संख्या काढली पाहिजे-’
‘बरोबर- ती किती आहे?’
तो चूप!
‘म्हणजे आपल्याला कच्च्या आंब्यांची संख्या माहीत नाही, होय की नाही?’
त्याने मान डोलविली.
‘मग ती संख्या काढायची, सोप्पं आहे, कर आता!’
थोडा वेळ मी खाली गेलो.
परत येऊन पाहतो तर-तर काय? पाटीच्या दुस~या बाजूला तो रेघोटया मारीत बसला होता. मला रागच आला. वाटले, एक थोबाडीत ठेवून द्यावी. पण मी माझा राग आवरला आणि त्याला शांतपणे विचारले,
‘हं, सांग आता- काय काय केलं?’
‘एका झाडावर-’ तो पुन्हा झाडावर चढला
त्याला झाडावरून सावकाश खाली घेत मी विचारले,
‘झाडावर एकूण किती आंबे आहेत?’
‘एका झाडावर पन्नास आंबे आहेत-’
‘पाडाला आलेले आंबे किती आहेत?’
‘पाच-मामा, झाड पाडाला येत नाही?’
‘फालतू विचारू नको, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची.हं- सांग- आता आपल्याला कोणती संख्य काढाली पाहिजे?’
‘कच्च्या आंब्यांची संख्या काढली पाहिजे’
‘बरोबर, ती किती आहे?’
‘ती आपल्याला माहीत नाही’
‘शाब्बास! अगदी बरोबर-मग आता आपल्याला काय करावं लागणार?’
‘गणित करावं लागणार.’
‘ते झालं रे, पण गणित कशाचं आहे?’
‘भागाकाराचं!’
‘आँ-??’
‘गुणाकाराचं-’
‘गुणाकाराचं?’
‘होय..’
तो शांत. मी संतप्त...
त्याने पटकन गणित केले. पन्नस गुणिले पाच बरोबर अडिचशे.
‘दोनशे पन्नास हे काय आहे?’
‘उत्तर आहे.’
‘पण ते कशाचे उत्तर आहे?’
‘गणिताचे-या गणिताचे!’ त्याने पाटीवर पेन्सिल नाचवून मला गणित दाखवले.
आता मात्र माझा ‘स्टँमिना’ पूर्ण खलास झाला.
‘पन्नास ही कशाची संख्या आहे?’
‘झाडांची संख्या आहे...’
‘झाडांची संख्या आहे? पुन्हा एकदा चाह पाहू गणित-’
’एका झाडावर पन्नास आंबे आहेत-’
‘थांब-’ त्याला मध्येच थांबवीत मी विचारले, ‘पन्नास ही संख्या कशाची संख्या आहे?’
‘एका खा्डावरील झाडांची संख्या- नाही, नाही, आंब्यांची संख्या आहे.’
‘बरोबर, आता गणितात दुसरी संख्या कोणती दिली आहे?’
‘पाच.’
‘पाच ही कशाची संख्या आहे?’
‘पाच ही पाडाला आलेल्या आंब्यांची संख्या आहे.’
‘बरोबर, पन्नास आंब्यांपैकी पाच आंबे पाडाला आले आहेत. पाडाला आलेले आंबे बाजूला काढून ठेवले, की-’
‘कच्चे आंबे मिळतील.’
‘अगदी बरोबर, पण त्यासाठी काय केले पाहिजे?’
‘गणित केले पाहिजे-’
‘मग कर पाहू,’
‘पन्नास भागिले पाच-’
‘नाही, पन्नास गुणिले पाच-’
‘गुणिले? ’ कपिलच्या उत्तराने मी तर कावूनच गेलो. म्हणालो, ‘अरे, बाबा-पन्नास आंब्यांमधून पाच आंबे जर बाजूला केले तर आंब्यांची संख्या कमी होईल, की जास्त होईल?’
‘जास्त होईल-’
‘जास्त होईल?’
‘नाही, नाही-कमी होईल..’
‘मग काय केले पाहिजे?’
‘वजाबाकी!’
ह्या लेखी गणिताला कंटाळून कपिल एक मला म्हणाला होता,
‘मामा, धृवबाळाचं एक बरं आहे बघ रे...’
मला त्याचे बोलणे समजले नाही. मी विचारले, ‘म्हणजे?’
‘म्हणजे त्याला गणितंबिणितं काही करावी लागत नाहीत रे!’ मग अधिक गंभीर होत त्याने मला प्रश्न केला,
‘मी तर आणखी थोडासा मोठठा झाल्यावर धृवबाळच होणार बघ बाबा! पण माम तपश्चार्येसाठी जंगलातच जावे लागते काय रे?’

कपिल / दहा

आपलेही नाव वर्तमानपत्रात, मासिकात छापून यावे, असे कपिलला फार वाटते. एखाद्या पेपरमध्ये किंवा मासिका-साप्ताहिकात माझे नाव छापून आलेले दिसले रे दिसले, की तो डोळे व मान उडवीत म्हणतो, ‘मग काय मामा, जोर आहे तुझा! तू तर एकदम जगप्रसिद्धच झालास की रे!’
नाव छापून आले, की त्याच्यादृष्टीने ती व्यक्ती जगप्रसिद्ध झालीच!
एकदा त्याने मला विचारले, ‘मामा, तुझे नाव त्यांना कसे काय माहीत असते?’
‘अरे, त्यांना माहीत नसते,’ मी त्याला माहिती पुरविली. ‘आपनच ते कळवायचे असते. आपण कथा किंवा कविता लिहायची. त्या कथेखाली किंवा कवितेखाली आपले नाव लिहायचे, आणि ती कथा किंवा कविता पाकिटात घालून पोष्टाने पाठवून द्यायची त्यांच्याकडे.आपली कथा-कविता जर त्यांना आवडली तर ते ती छापतात आणि खाली आपले नावही छापतात!’
‘ते तुझ्याकडून पैसे घेतात त्यासाठी?’ त्याने अत्यंत हलक्या आवाजात प्रश्न केला.
त्याचेही बरोबरच होते म्हणा! कारण लग्नपत्रिकेसाठी वगैरे छापणारे पैसे घेतात, हे त्याने आपल्या मुंजीत पाहिले होते. त्यामुळे त्याची अशी भावना झाली होती. पण त्याच्या मनातून ती भावना पुसून टाकत छाती फुगवून मी म्हणालो,
‘छे!छे!-उलट तेच आपल्याला पैसे देतात-मानधन म्हणून!’
‘आपल्याला पैसे देतात?’ त्याच्या बोलण्यात आश्चर्य तर होतेच, पण त्याहीपेक्षा अधिक होता तो अविश्वास-माझ्यावरचा!
थोड्या वेळाने त्याने मला प्रश्न केला, ‘पण मामा, माझे नाव का छापून येत नाही?’
‘तूही कथा-कविता लिही की!’ त्याला मी ‘प्रोसिजर’ सांगू लागलो,‘तुला काय लिहावेसे वाटते ते लिही. आपण ते पोष्टाने पाठून देऊया. त्यांना आवदली तर ते ती छापतील, खाली नावही छापतील तुझी आणि नंतर मानधन म्हणून पैसेही पाठवून देतील मनिआँर्डरीने तुझ्या नावावर!’
त्याला माझे म्हणणे पूर्ण पटले. पण लगेच चिंताक्रांत होऊन तो म्हणाला,‘पण मामा, मला कशी लिहिता येणार रे, तुझ्यासारखी कथा-कविता! तू केवढा मोठठा-मी केवढा!सा!’
‘अरे, आपण प्रयत्न करायचा रे-प्रयत्न केला की सारे येते, होय की नाही?’
‘तेही खरंच म्हणा!’ अशा आशयाची त्याने मान हलविली.
पुढे केव्हातरी माझ्या हातावर वहीच्या पानाची एक घडी ठेवत तो म्हणाला,
‘मामा, मी दोन कविता लिहिल्या आहेत बघ! पेपरला पाठवून देऊया?’
मला आनंद झाला. मोठ्ठ्या कौतुकाने मी त्याने दिलेली कागदाची घडी उघडली आणि मी त्याची कविता वाचू लागलो...आणि-आणि मला दोन हजार व्होल्टेजचा धक्काच बसला!
कारण त्याच्या म्हणून त्याने लिहिलेल्या त्या दोन कविता म्हणजे आच्छादित साहित्यिक ‘चौर्य’ नव्हते, तर दिवसाढवळ्या टाकलेला तो धडधडीत ‘दरोडा’ होता! दोन्ही कविता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील होत्या! पैली होती इंदिरा संतांची आणि दुसरी होती कविवर्य कृ. ब. निकुंब यांची!

कपिल / अकरा

नशिब माझे की, कपिलने ‘मामा, मामीप्रमाणे तू का गळ्यात मंगळसूत्र बांधत नाहीस?’ असा कधी प्रश्न केला नाही. परंतु एक प्रश्न मात्र तो अधून मधून कारीत असे, आणि तो म्हणजे, ‘मामा, मामीच्या बोटात जशी अंगठी आहे, तशी तुझ्या बोटात का नाही?’ मग मीही त्याच्या प्रश्नाला हिच्याकडे पाहत हंसत हंसत उत्तर देत असे-‘अरे, मामी श्रीमंत आहे माझ्यापेक्षा, म्हणून तिच्या बोटात अंगठी आहे!’
“चांगलं फसवतोस की मला!’ अशा अर्थाने मान हलवून तो मला पुन्हा प्रश्न करी- ‘वा रे वा! तू आणि गरीब?’
मग तो मला माझ्या श्रीमंतीची लक्षणे सांगत सुटे. मीही ती लक्षणे भाराभर खोडून टाकत सुटत असे आणि त्याची मामीच कशी श्रीमंत आहे, ते भक्कम पुराव्यांच्या आधारे त्याला सांगत असे....अशा वेळी त्याची मामी मात्र माझ्याकडे लाल रंगाने पाहत असे!
आपल्या प्रत्येक गोष्टीची स्थिती हवा गेलेल्या फुग्यासारखी होते आहे, हे पाहून शेवटी त्याने एकदाचे दारिद्र्य मान्य केले!
पण किती दिवस? तर अगदी मोजकेच! कारण एका गाफिल क्षणी त्याने मला कैचित पकडले, नुसते पकडले नव्हे, तर माझी श्रीमंती मला ‘याचि देही-’ दाखवून ‘बाप दाखव, नाहीतर-’ अशी माझी स्थिती करून सोडली. तेव्हापासून त्याच्या दृष्टीने मी गरीब तर राहिलो नाहीच, उलट श्रीमंत-गर्भश्रीमंतच बनून गेलो! शेवटी झक मारत त्याने दाखून दिलेली माझी श्रीमंती मला मान्य करावी लागली...
म्हणजे जे घडले ते असे:
मी फार चांगले गातो, अशातला भाग नाही. पण जे काही वेडेवाकुडे गातो, त्यात डोकावणारे कुमार गंधर्व माझ्या मित्रमंडळींना जाणवतात आणि ते माझी कधी कौतुक तर कधी चेष्टा करतात!...
तर गेल्या दिवाळीतील गोष्ट. ‘राष्ट्रीय सेवा योजने’ चे दहा दिवसांचे शिबिर आमच्या काँलेजमध्येच भरले होते. प्राचार्याची अनेक सूचनांपैकी हीही एक सूचना होती, की रोज रात्री स्थानिक कलाकारांचे तासाभराचे मनोरंजनाचे कार्यक्रम घडवून आणायचे. ...
ठरल्याप्रमाणे माझ्याही वाटयाला एक रात्र आली....
सुरुवातीला मी काही मराठी नाटयगीते, भावगीते व भक्तिगीते म्हणायची, असे ठरविले. पण पुन्हा विचार केला, तीच ती-तीच ती गाणी म्हणण्याऎवजी एखादा वेगळा कार्यक्रमच बसविता येतो काय, ते पहावे....
दरम्यानच्या काळात कुमार गंधर्वांची काही हिंदी पदे गेली होती व त्यातून माझी अशी एक आगळी कल्पना आकारू लागली ....
कबीरवाणी! संत कबिरांची निवडक पाच पदे.
प्रथम संत कबिरांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा परिचय आणि नंतर त्याला अनुरूप आसे एक पद-बस्स!
जुन्या वाडयातल्या सुजाता, ‘तुप्पी’, उजव्या घरातला विजू, डाव्या घरातली मंदा अशा चार-पाच मुला-मुलींचा संच तयार केला. एकाच्या हातात अँल्युमिनियमचा रिकामा डबा, एकाच्या हातात टाळ, एकाच्या हातात हार्मोनियमचा भाता. हार्मोनियमवर बारीकसे दोनच सूर-षडज आणि पंचम! सोबत दीपचंदी ठेका. ..
कार्यक्रम झकास झाला. लोकांनी कौतुक वगैरे वगैरे केले.
सांगायचे मुख्य म्हणजे हे सर्व कपिलच्या डोळ्यांपुढेच घडत होते.
हा सर्वस्वी नवा अनुभव त्याने टीपकागदी नजरेने टिपून घेतला होता. ...‘कोरस’ मधील त्याचा आवाज तर ‘समे’ प्रमाणे उठून दिसत असे!
पुढे पुढे तर आमची रात्रीची जेवणे झाल्यानंतर ‘कबीरवाणी’ चा
कार्यक्रम अपरिहार्यच होऊन बसला...
काही दिवसानी मधल्या वाड्यातल्या वसंतकाकांनी मला हार्मोनियमऎवजी एकतारी आणि अँल्युमिनियमच्या रिकाम्या डब्याऎवजी मातीचा रिकामा माठ घेण्याची सूचना दिली. मग लगेच कुंभार गल्लीत जाऊन एक माठ विकत आणला. पण आमच्या ‘माठिया’ च्या हातात काही माठ ‘टिकेचिना’. दोन-तीन माठ फुटले आणि आंही माठाला ‘खाट’ केले...
आता एकतारीचा नंबर! पण योगायोगाने आमच्या या कार्यक्रमाची कल्पना आवडून विजूताईंकडून ‘सप्रेम भेट’ या सदराखाली एक एकतारी मिळाली.
एकतारी मिळाली खरी, पण तिथेही घोडे अडलेच! कारण ती हातात घेणार कोण, असा बिकट प्रश्न निर्माण झाला. मला तर हातात कोणतेही वाद्य घेऊन गाणे म्हणायची संवय नव्हती. एक तर वाद्य बंद होऊन गाणे तेवढेच म्हटले जाते किंवा गाणे बंद होऊन वाद्यच तेवढे वाजविले जाते!
बरं, आणखी कुणाच्या तरी हातात ते वाद्य द्यावे म्हटले तर संचातील मंडळी एकतारीपेक्षाही लहान!
शेवटी मी हिच्याच हाती एकतारी द्यायची ठरवली.
दिलीही. पण हिला काही एकतारी वाजवायचे जमेना...काही मिनिटांतच एकतारीचे ‘बिनतारी’ त रूपांतर करून दाखविण्याची किमया हिने पेश केली...
मग मी तारा आणल्या. हिने पुन्हा त्या छेडण्याऎवजी तोडल्या...
शेवटी कंटाळलो, कंटाळलो, कंटाळलो. चिडलो, रागावलो, भडकलो. आणि अखेरीस मीच हातात एकतारी घेऊन कबिरांची पदे गाऊ लागलो...
सांगायचा मुद्दा म्हणजे कपिलच्या नजरेतून हे ‘नाटय’ ही सुटले नाही. नव्हे, ते त्याच्या मनात कुठेतरी खोल खोल रुतून बसले असावे...
माझ्या ध्यानीमनी नसताना, माझे दोन्ही हात घट्ट धरून तो एकदा मला म्हणाला, ‘मामा, तू गरीब आहे, म्हणतोस, खरं मामेपेक्षा तुलाच एकतारी वाजवायला येते की नाही, सांग!’
तर असा हा कपिल!

फारा वर्षांपूर्वी खांडेकरांच्या ‘सुलू’ ने मला साईगितले होते,
सांगितले होते, की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात किमान एक तरी कादंबरी लिहू शकेल.
कारण प्रत्येकाचे आयुष्य हीच एक कादंबरी असते!
खरे आहे ते!
ते खरे आहे, आणि हेही खरे आहे, की प्रत्येक माणसाप्रमाणे प्रत्येक लहान मुलाचे आयुष्यही कादंबरीसारखेच असते!
केवळ कादंबरी नवे, तर महाकाव्य!
कैक मासांच्या सहवासाने कपिलने मला हे जानवून दिले आहे!
तर असा हा कपिल. तो जसा गुणी आहे, हुषार आहे, कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे तसाच तो हट्टीही आहे, तापट आहे, संतापी- चिडखोरही आहे!
आणि मी? मीही त्याच्यासारखाच-तापट, हेकट, रागीट!
म्हणूनच कदाचित आमचे षडज-पंचम जुळत असावे!
नाही असे नाही, कधी कधी आम्हा उभयतांमध्ये बेसूर निर्माण होतो.तारा नको तशा चढतात-उतरतात! मग मी त्याच्यावर डोळे वटारतो. अनावर होऊन रागे भरतो. म्हणतो-‘जा, जा तू तुझ्या आईच्या घरी परत! एक क्षणभरही राहू नकोस माझ्या घरात- माझ्या गावात!!’
पण अशावेळी तो उलट बोलत नाही. माझ्याकडे पाहत नाही...
सरळ उठतो. कोप~यात अडकविलेले शाळेचे दप्तर मुकाटयाने घेतो. आपले दिसतील ते कपडे त्यात भरतो.‘मामी, माझी शिटटी कुठे आहे,’, ‘मामी, माझा भोवरा कुठे आहे?’ असे प्रश्न विचारीत जिन्याच्या एकेक पाय~या उतरू लागतो...
माझे घर-माझे गाव सोडून आपल्या घरी-आपल्या गावी जाण्यासाठी आवराआवर करू लागतो....
माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते...
रेडियोवर वसंतराव गात असतात-‘दाटून कंठ येते...’
उरात कालवाकालव दाटते...
कपिलच्या निघून जाण्याच्या कल्पनेने मी व्याकुळ होतो !
मन आक्रंदू लागते...
‘कपिल तू जाऊ नकोस! कपिल तू जाऊ नकोस!’
पण-पण जाणारच तो! आज ना उद्या जाणारच की! जावेच लागणार आहे त्याला....तो काय कायमचा असा थोडाच राहायला आला आहे आपल्य़ाकडे? पाखरू कितीही आकाशात नाचले तरी शेवटी त्याचे पंख स्वत:च्या घरटयाकडे वळणारच !
कपिल तू जा! आपल्या घरी जा! सुखाने जा!
तुझे जीवन कुमारांच्या तानेसारखे झळकत राहो!!..